Logo

गुंतवणुकीचं तंत्र आणि मंत्र

गुंतवणुकीची काही पथ्यं

 

डिसेंबर महिना सुरु झाला आहे आणि गुलाबी थंडीच्या चाहुलीसोबत शेअर बाजाराने घेतलेल्या भरारीने इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार सुखावले असतील. साहजिकच अनेकांना सप्टेंबर-ऑक्टोबर मधली बाजारातील पडझड, त्यावेळी एकामागून एक येणाऱ्या निराशाजनक आर्थिक बातम्या, 'येणारा काळ अजून खराब कसा असेल' ह्या विषयीच्या चर्चा वगैरे गोष्टींचा काहीसा विसर पडला असेल. मात्र शेअर बाजार म्हटलं की पडझडीचे प्रसंग पुनःपुन्हा येत राहणार. तेव्हा सामान्य गुंतवणूकदाराने आपला धीर सुटू नये, लक्ष विचलित होऊ नये ह्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही पथ्यं सांभाळावी लागतात त्याचा आढावा आपण आज घेऊ.

 

सर्वात प्रथम गुंतवणूकदाराला हा आत्मविश्वास असला पाहिजे की इक्विटी म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. आपण जे करतोय त्यावरच जर आपला पूर्ण विश्वास नसेल तर थोड्याश्या अडचणीने देखील गुंतवणूकदार हवालदिल होऊ शकतो. त्यासाठी वेळ घालवून, वाचन करून किंवा तज्ञ व्यक्तीशी चर्चा करून स्वतःचे ह्या विषयातले ज्ञान वाढवले पाहिजे. इक्विटी किंवा समभागांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक म्हणजे एखाद्या कंपनीत / व्यवसायात विकत घेतलेला मालकी हक्क आहे आणि त्यामुळे त्याच्यावरील परतावा कंपनीच्या कामगिरीनुसार ठरणार ह्याची खूणगाठ बांधली पाहिजे. कुठलाही व्यवसाय म्हटला की नफा, विक्री ह्यात वर-खाली होत राहणार आणि सुनिश्चित दराने प्रतिवर्षी परतावा मिळतो आहे असे होणार नाही. आणि हाच इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतील जोखमीचा भाग आहे.

 

आता कोणालाही असा प्रश्न पडेल की ही जोखीम कोणी का पत्करावी? तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आपल्याला चलनवाढीच्या दराच्या कितीतरी जास्त परतावा देऊ शकते. उदाहरणार्थ, निफ्टी किंवा सेन्सेक्स ह्या प्रमुख इंडेक्समधील गेल्या २५-३० वर्षातील वाढ बघीतली तर प्रतिवार्षिक वृद्धिदर १५% च्या आसपास होता असे दिसते. आणि ही सगळी वाढ हर्षद मेहता / केतन पारेख घोटाळे, १९९७ सालचे आशियाई देशांतील चलनसंकट, २००१ च्या सुमारास डॉट कॉम क्षेत्रातील अतिप्रचंड पडझड, २००८-०९ सालचे जागतिक आर्थिक संकट आणि इतर अनेक लहानमोठ्या संकटांचा सामना करून झालेली आहे. ह्याच्या तुलनेत गेल्या तीन दशकात भारतातील महागाईचा दर वार्षिक सरासरी -.% च्या आसपास राहिला आहे. म्हणजेच इक्विटी क्षेत्रातील गुंतवणूक आपल्याला चलनवाढीवर मात करून आर्थिक उन्नतीसाठी मदत करू शकते.

 

जेव्हा आपल्याला मुदतठेवीवर बँक -.% व्याज देते तेव्हा ते पैसे काही बँकेत पडून राहणार नसतात. बँक आपले -.% मार्जिन त्यात घालून ११-१२% सरासरी दराने ते पैसे पुढे कर्जाऊ देत असते. बहुतांशी व्यावसायिकांना ही कर्जे १२-१४% दराने उपलब्ध होतात. अशा चढ्या दराने घेतलेली कर्ज फेडण्यासाठी व्यवसायातून १८-२०% वार्षिक परतावा मिळणे गरजेचे असते. इक्विटी किंवा समभागांच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक म्हणजे बँकेकडे -.% च्या मुदतठेवीत पैसे ठेवण्याऐवजी १८-२०% परतावा मिळवू शकेल अशा व्यवसायात गुंतवणे होय. ह्याचाच अर्थ आपण जास्तीची जोखीम ह्या अतिरिक्त लाभ मिळवण्याच्या उद्दिष्टातून उचलत असतो.

 

आता शेअर बाजाराचे स्वरूपच असे आहे की त्यात ‘करेक्शन’ म्हणजेच पडझड नित्यनेमाने होत असते. गेल्या ३ दशकांमधील भारतीय शेअर बाजाराचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की जवळजवळ प्रत्येक वर्षी निफ्टी / सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकापासून एकदा तरी १०%-१५% खाली आलेले आहेत, प्रत्येक ३-५ वर्षांच्या काळात किमान एकदा २०%-३०% ची पडझड झाली आहे, आणि प्रत्येक १० वर्षांच्या कालखंडात एकदा ४०%-५०% पडणं हे स्वाभाविक मानले जाते. आपल्याला शेअर बाजारातील पडझडीकडे एखादी समस्या म्हणून नव्हे तर त्याचा आंतरिक भाग, एक स्वभावविशेष म्हणून बघायला शिकले पाहिजे. जास्तीच्या परताव्याचा विचार करताना शेअर बाजाराला त्याच्या ह्या आपल्याला न आवडणाऱ्या वैशिष्ट्यासह स्वीकारणं गरजेचं आहे.

 

ह्या करेक्शनच्या धक्क्यांपासून आपण आपली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित ठेऊ शकतो का? जगभरातील असंख्य शेअर बाजार विश्लेषक आणि अर्थसंशोधक वर्षानुवर्षं अशा रामबाण उपायाच्या शोधात आहेत की ज्यामुळे शेअर बाजार कधी पडेल, किती पडेल, किती काळ पडत राहील, केव्हा, किती वर जाईल वगैरे प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील आणि त्यानुसार निर्णय घेत राहिले की शेअर बाजारातील पडझडीच्या त्रासातून पूर्ण मुक्तता मिळेल. असे संशोधक आणि विश्लेषक हे परीस किंवा अमृत शोधणाऱ्या लोकांपेक्षा फारसे वेगळे नाहीत. शेअर बाजार अतार्किक आणि अनपेक्षित पद्धतीने वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक लोकांना हा अनुभव येतो की आपण जेव्हा गुंतवणुक करतो तेव्हाच बाजारात पडझड सुरु होते, जणू काही आपलीच वाट बघत होती. आणि जेव्हा आपण पैसे बाहेर काढून घेतो तोपासून थोड्याच काळात बाजाराने पुन्हा भरारी मारायला सुरुवात केलेली असते.

 

ह्याचसाठी गुंतवणूकदारांना इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना पाळावं लागणारं पुढचं पथ्य आहे ‘सुनिश्चित उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक’. सुरुवातीलाच हे ठरवून घ्या की आपल्याला कशासाठी ही गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे बाजारातील चढउतारांकडे आपण योग्य दृष्टीकोन ठेऊन बघू शकतो आणि फुकाची चिंता आणि चुकीचे निर्णय टाळू शकतो. उदाहरणार्थ, जर आज पासून २० वर्षांनी सेवानिवृत्तीसाठी पुंजी जमा करण्यासाठी मी गुंतवणूक सुरु केली असेन तर २०१८-१९ मधे होणाऱ्या बाजारातील चढउतारांमुळे मी अस्वस्थ होऊन चालेल का?

 

गुंतवणुकीचे दिवसागणिक घटणारे मूल्य समोर दिसत असताना असा दीर्घकालीन विचार करणं अनेकांना कठीण वाटू शकेल. पण ते अजिबात कठीण नाही. आपल्यातले अनेक जण आजही विमा कंपन्यांच्या एन्डोमेंट किंवा मनीबॅक प्रकारच्या योजना गुंतवणूक म्हणून घेतात. त्यांनी आपल्या ह्या ‘गुंतवणुकी’चे पहिल्या ८-१० वर्षात परतावा मूल्य – पॉलीसी बंद केल्यास परत किती पैसे मिळू शकतात – माहित करून घेतले तर शेअर बाजारातील १५%-२०% पडझडीचे त्यांना काहीच वाटणार नाही. ज्यांना रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी योग्य वाटते अशांनी विकत घेतलेल्या घराला पुढील वर्षी किती किंमत येते ते पाहावे. शेअर बाजारात रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचं मुल्यांकन होत असतं, ते आपण बघू शकतो त्यामुळे पडझडीचा मानसिक ताण येतो. मात्र इतर ठिकाणी मुल्यांकन इतके सुलभ आणि पारदर्शी नसल्यामुळे सुरक्षिततेचा आभास निर्माण होतो. यशस्वी होण्यासाठी गुंतवणूकदारांनी ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे.

 

-- प्राजक्ता कशेळकर